नातवंडं मराठी निबंध | Grandchildren essay in marathi

नातवंडं मराठी निबंध | Grandchildren essay in marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण नातवंडं मराठी निबंध | Grandchildren essay in marathi बघणार आहोत.

नातवंडं 


नातवंड म्हणजे काय चीज असते,

आई रागावली की आजी कडील धाव असते.


नातवंड म्हणजे लोण्याचा गोळा,

पाळण्यातून अलगद काढून घ्यावा.


नातवंड म्हणजे गुलाबाची पाकळी

पुस्तकात जपलेली पानावरची जाळी.


नातवंड म्हणजे विड्यातला गुलकंद सगळ्या चवींना बांधतो एक संध.


नातवंड म्हणजे खव्याचा पेढा

अखंड आनंद घ्या हवा तेवढा.


नातवंड म्हणजे त्रिवेणी संगम

तिस-या पिढीचा असतो उगम.


आजी आजोबांचं घरातलं महत्व वाढविणारी नातवंडं म्हणजे घराघरातले लिटल एंजल्स जणू. पण होतं काय की प्रत्येक तरुण आईबापाना वाटतं की आजोबा-आजी नातवंडांना उगाचच लाडावतात, नको त्या सवयी लावतात. थोडक्यात हे तरुण आईबाप लहान असताना आजीआजोबांच्या प्रेमाचे आणि लाडाचे किती भुकेले होते, त्या लाडांची आणि प्र्रेमाची किती पाठराखण करायचे हे विसरून जातात.


 पिढ्यानपिढ्या हे चक्र सुरूच आहे. आताच्या जमान्यात तर घरंच वेगवेगळी झालीयेत. प्रत्येकाची प्रायव्हसी ही काळाची गरज आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी नातवंडांना सांभाळणारे, दिवसभर नातवंडांना सांभाळणारे, संध्याकाळी नातवंडांना सांभाळणारे, वीकेंड्सना नातवंडांना सांभाळणारे, शाळेतून घरी घेऊन येणारे असे आजी-आजोबांचे अनेक प्रकार बघायला मिळतात. 


काळाचा महिमा म्हणूया, पण तरीही आपल्या भारतात बर्‍यापैकी एकत्र कुटुंबपद्धती टिकून आहे. खरंतर आपल्या भारतात मुलीला करियर करायचं असेल तर तिला साथ देणारी एकत्र कुटुंबपद्धती हे वरदान आहे. मध्ये छोट्या कुटुंबांची खूप वाढ झाली पण आता थोडा बदल होताना दिसतोय आणि बरीच कुटुंबं ‘आजी आजोबा नातवंडं’ अशी सुखाने नांदताना दिसतायत. 



                                    नातवंडं

नातवंडांच्या पावलांनी घरात पुन्हा वसंत अवतरतो. नातवंडांना दुधावरची साय मानणाऱ्या आजी-आजोबांना त्यांच्यात आपलं तिसरं बालपण दिसते.


गृहिणीच्या पावलांनी घरी लक्ष्मी येते हे खरंच. पण ती आली,सुखेनैव नांदली. वर्षे सरली. घरात जन्मलेल्या लेकरांना पंख फुटून त्यांनी बाहेर उड्डाण केले की रिकाम्या झालेल्या घरात आजी-आजोबा एकटेच उरतात, पण नातवंडांच्या पावलांनी घरात पुन्हा वसंत अवतरतो. नातवंडांना दुधावरची साय मानणाऱ्या आजी-आजोबांना त्यांच्यात आपलं तिसरं बालपण दिसत असतं. स्वत:ला मुलं होतात तेव्हाही त्यांच्यात आपलं बालपण दिसतं. पण आपण ते बघण्याच्या मूडमध्ये नसतो. मुलांचं संगोपन कसं होईल, मोठी झाल्यावर ती व्यवस्थित मार्गी कशी लागतील, याचे मनावर तणाव असतात. पण नातवंडांची बातच न्यारी असते.


 लग्न झालं की मुलगी सासरी जाते. हल्ली मुलगा देखील लगोलग नव्या सदनिकेत जातो. तिकडे नातवंडं जन्माला येतात. थोडी मोठी झाली की सांभाळायला म्हणून आजी-आजोबांकडे येतात. निदान सुटीमध्ये तरी नक्की राहायला येतात. शिशिरात पानझड झालेल्या वृक्षांना वसंतात पुन्हा पालवी फुटावी तसं म्हातारं घर नातवंडांच्या आगमनानं पुन्हा फुलतं. बहरतं. हसायला लागतं. नातवंडांच्या आíथक संगोपनाची, शाळाप्रवेशाची जबाबदारी मुलासुनांनी, मुलीजावयांनी घेतलेली असते. आता त्या पिलांना नुसतं जवळ घेऊन लाड करायचे असतात. त्यांना बिघडवायचं असतं. त्यापायी होणारं मुलाचं, सुनेचं, मुलीचं, जावयाचं करवादणं कानांआड करायचं असतं.

 पुलंनी एका लेखात म्हटलंय, ‘‘आजोबांसारखा खेळगडी मिळाला तर मुलांच्या आनंदात भर पडते. खेळगडी होऊन पोरांच्यात रमलेला म्हातारा हादेखील मजेदार अनुभव असतो. सत्तरी उलटलेल्या सेनापती बापटांना मी गल्लीतल्या पोरांबरोबर विटीदांडू खेळताना पाहिले आहे.’’

 तर पाडगावकरांच्या कवितेतले आजोबा नातीशी दंगामस्ती करताना मुलात मूल होऊन रमतात आणि मधूनच आपल्या खोलीत जाऊन काहीबाही आठवताना मुके होऊन जातात.

 ‘‘आजोबांच्या खोलीत आता

 धुकं धुकं धुकं

 आजोबांचं जग सगळं

 मुकं मुकं मुकं.’’


 संध्याकाळी आपल्या खोलीतून बाहेर आलेले आजोबा अंगणातल्या झाडाखाली बसतात तेव्हा ती कातरवेळ त्यांना गूढ आठवणींच्या गावात घेऊन जाते.


 ‘‘आजोबा संध्याकाळी

 अंगणातल्या झाडाखाली

 आपल्या आरामखुर्चीवर

 एकटेच बसत

 एकटक डोळे लावून

 दूर कुठे बघत असत..’’


 दिवसभर त्यांच्याशी दंगामस्ती करणारी ती नात पाय न वाजवता त्यांच्या मागे जाऊन उभी राहते नि बघते तेव्हा तिला काही दिसत नाही. तिला दिसते फक्त आजोबांची सावल्यांमध्ये बुडून गेलेली खुर्ची आणि धुकं धुकं धुकं..

 पण जुन्या आठवणींनी किंवा आणि कशाने व्याकूळ झाले तरी आजोबा असोत की आजी – नातवंडांच्या ओठांवर कायम हसू पेरीत असतात. स्मिता जोगळेकरांच्या कवितेतली आजी अशीच प्रेमळ आहे,

 ‘‘आजीसाठी नात म्हणजे

 दुधावरची साय असते

 पण नातीसाठी आजी

 त्याहून बरंच काय काय असते."



टीप : वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते

  • bond between grandparents and grandchildren in marathi
  • role of grandparents in children's life in marathi
  • नातवंड दुधावरची साय

Previous
Next Post »